सोलापूर हॅलो रिपोर्टर न्यूज | तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी अवैध व्यवसायांविरोधात मोठी आणि धडक कारवाई करत मुळेगाव तांडा परिसरातील अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर छापे टाकले. या कारवाईत हातभट्टी निर्मितीची ठिकाणे पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आली असून सुमारे 26 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई राबवली. छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू, कच्चा माल, रसायने, ड्रम, भांडी व इतर साहित्य आढळून आले. सदर साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
याप्रकरणी सराईत हातभट्टी व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अवैध दारू निर्मितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात राबवण्यात आलेली ही कारवाई गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.


0 Comments