Advertisement

Breaking News
Loading...

शिवभोजन केंद्र चालकांकडून खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकाराचा जामीन फेटाळला; न्यायालयीन कोठडीत रवानगी...

 


सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्यूज: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या शिवभोजन केंद्र चालकांकडून खंडणी वसुली केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नितीन मच्छिंद्र कांबळे या तोतया पत्रकाराचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


समता शिवभोजन केंद्राचे चालक इरफान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात कांबळेविरुद्ध खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करून पोलीस कोठडीत ठेवले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याने जामीनासाठी अर्ज केला. मात्र न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जामीन अर्ज फेटाळत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.


फिर्यादीनुसार, शिवभोजन केंद्र सुरू ठेवायचे असल्यास दरमहा ठराविक रक्कम देण्याची मागणी नितीन कांबळे करत होता. पैसे न दिल्यास पुरवठा विभागाकडे खोट्या तक्रारी करणे तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होता. मार्च 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत फिर्यादी व अन्य शिवभोजन केंद्र चालकांकडून एकूण 2 लाख 44 हजार 500 रुपयांची रोख खंडणी उकळल्याचा आरोप आहे. ही रक्कम काही वेळा स्वतः तर काही वेळा अनिल भिंगारे या केंद्र चालकाच्या मार्फत घेतल्याचेही नमूद करण्यात आले आहे.


डिसेंबर महिन्यासाठीही 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप असून, ऑगस्ट 2025 मध्ये हप्ता वाढवून मागितल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याने अज्ञात व्यक्तीमार्फत खोट्या तक्रारी करून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


आरोपीला कडक शासन करा:

कोविड काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन योजना ही गरीब व गरजू नागरिकांना केवळ 10 रुपयांत सकस जेवण देण्यासाठी आहे. या योजनेतील केंद्र चालकांना धमकावून खंडणी वसुली केल्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून आरोपीला कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी शिवभोजन केंद्र चालक व रेशन दुकानदारांकडून केली जात आहे.


वेळीच मुसक्या आवळायला हव्या होत्या:

नितीन कांबळे व त्याच्या साथीदारांविरोधात वारंवार खंडणी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या ‘ब’ परिमंडळ कार्यालयाने यापूर्वी दोन वेळा जेलरोड पोलिसांकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आरोपीची मजल वाढली. वेळीच कारवाई झाली असती तर शिवभोजन केंद्र चालकांकडून खंडणी मागण्याचे धाडस झाले नसते, अशी चर्चा केंद्र चालक व रेशन दुकानदारांत सुरू आहे.

Post a Comment

0 Comments