Advertisement

Breaking News
Loading...

सोलापुरात खंडणीचा पर्दाफाश...! ‘मी पत्रकार आहे’ म्हणत शिवभोजन केंद्र चालकांकडून दरमहा हप्ता; आरोपीला ४ दिवसांची पोलिस कोठडी...

 


सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्यूज: सोलापूर शहरातील शिवभोजन केंद्र चालकांकडून दरमहा खंडणी उकळल्याप्रकरणी नितीन मच्छिंद्र कांबळे (रा. सदर बझार, सोलापूर) याच्याविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भवानी पेठ येथील शिवभोजन केंद्र चालक इरफान युन्नूस शेख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. न्यायालयाने शुक्रवारी (ता. २६) आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी इरफान शेख हे शासनाच्या योजनेअंतर्गत शिवभोजन केंद्र चालवत असून, संशयित कांबळे हा केंद्राच्या कामकाजाबाबत वारंवार आक्षेप घेत होता. ‘शासनाच्या नियमांनुसार तुम्ही शिवभोजन केंद्र चालवत नाहीत’ असे सांगत तो केंद्राचे फोटो काढून अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची धमकी देत होता. या भीतीपोटी शहरातील विविध भागांतील शिवभोजन केंद्र चालकांकडून त्याने दरमहा हप्ता सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

डिसेंबर महिन्यात आरोपीने हप्ता वाढवून मागितला होता. पैसे न दिल्यास ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तो केंद्र चालकांना मानसिक त्रास देत होता. ‘माझे कायद्याचा दणका साप्ताहिक आहे, तसेच मी शिवशक्ती व भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघाचा अध्यक्ष आहे’ असे सांगून तो दबाव टाकत असल्याचा आरोप आहे.

या सततच्या त्रासाला कंटाळून इरफान शेख यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतरही कांबळे याने एका व्यक्तीला तसेच फिर्यादीला फोन करून दमदाटी केली. या धमकीचे ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, आरोपी कांबळे याच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असून, त्यासाठी आर्थिक गरजेमुळेच त्याने हप्ता वाढवून मागितल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक गोविंद पवार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


🔴 रेशन दुकानदारांचाही गंभीर आरोप:

तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाब समोर आली असून, सोलापूर जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यांतून बदली होऊन आलेल्या अधिकाऱ्यांना कांबळे विविध अर्ज करून त्रास देत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. याशिवाय, शहरातील काही रेशन दुकानदारांनीदेखील पोलिसांशी संपर्क साधत, कांबळे याने आम्हालाही अशाच प्रकारे धमकावल्याचा आरोप केला आहे. हे रेशन दुकानदार शनिवारी पोलिस ठाण्यात हजर राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments