मंद्रूप | दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : मंद्रूप येथे कृषी विभागाच्या वतीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘पाचट जाळू नका, पाचट कुजवा’ हा संदेश देत ऊस कापणीनंतर शिल्लक राहणाऱ्या पाचटाचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले.
ऊस कापणीनंतर पाचट जाळणे म्हणजे जमिनीची सुपीकता जाळण्यासारखे असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय श्री. शुक्राचार्य भोसले यांनी केले. पाचट न जाळता ते शेतातच कुजवल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) वाढतो, जलधारण क्षमता सुधारते व जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकते, असे त्यांनी स्पष्ट केले. याउलट पाचट जाळल्यास उपयुक्त सूक्ष्मजीव व मित्रकीटक नष्ट होऊन उत्पादनावर विपरीत परिणाम होतो, असेही त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे पाचट व्यवस्थापनामुळे रासायनिक खतांवरील खर्चात कशी बचत होते, हे शेतकऱ्यांना दाखवून देण्यात आले.
या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी मंद्रूप येथील प्रगतशील शेतकरी श्री. शेंडगे सर यांच्या शेताला भेट देऊन इस्राईल तंत्रज्ञानाच्या (Israel Technique) आधारे करण्यात आलेल्या ऊस लागवडीची पाहणी केली. आधुनिक लागवड पद्धती, अचूक खत व्यवस्थापन व सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी नियोजन केल्यास ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य असल्याचे श्री. भोसले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले. श्री. शेंडगे सर यांनी अवलंबलेले तंत्रज्ञान भविष्यातील शाश्वत शेतीसाठी आदर्श ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात मंद्रूप परिसरातील ट्रॅक्टर व्यावसायिक श्री. विकास वाघमोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गेल्या ८ ते १० वर्षांपासून ते परिसरात ‘ऊस पाचट कुट्टी’ करून देण्याचे काम सातत्याने करत असून, त्यांच्या यंत्रिकीकरणामुळे पाचट व्यवस्थापन शेतकऱ्यांसाठी सुलभ झाले आहे. शेतीमध्ये यंत्रांचा प्रभावी वापर करून वेळ व मजुरीची बचत केल्याबद्दल त्यांचे मान्यवरांनी कौतुक केले.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांपुरते मर्यादित न राहता आधुनिक शेतीकडे वळावे, असे आवाहन दक्षिण सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी माननीय श्री. अवधूत मुळे यांनी केले. आधुनिक ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन व मल्चिंग पेपरचा वापर करून फुलशेती केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आर्थिक समृद्धी येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “शेतकऱ्यांनी केवळ उत्पादक न राहता व्यापारी दृष्टिकोन ठेवावा,” असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय श्री. शुक्राचार्य भोसले, तालुका कृषी अधिकारी माननीय श्री. अवधूत मुळे, मंद्रूपचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री. रमेश फरताडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांत कुंभार, श्री. शेंडगे सर, श्री. हिरेमठ सर, श्री. नितीन खराडे, श्री. प्रकाश वाघमोडे, श्री. अनिल खट्टे, श्री. महेश कचरे, श्री. संगण्णा गुंडके यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थेट बांधावर येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मंद्रूप परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, आधुनिक व शाश्वत शेतीकडे वळण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.





0 Comments