सोलापूर ग्रामीण| हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस दरवर्षी ०२ जानेवारी रोजी साजरा केला जातो. ०२ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला होता. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने दिनांक ०२ जानेवारी २०२६ ते ०८ जानेवारी २०२६ या कालावधीत पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील कवायत मैदानावर विशेष जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन, सायबर सुरक्षा मार्गदर्शन, महिला सुरक्षेबाबत जनजागृती, अंमली पदार्थांविरोधातील जनजागृती, श्वान पथकाची प्रात्यक्षिके, तसेच पोलीस बँड डिस्प्ले यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रिकेट, बास्केटबॉल, खो-खो यांसारख्या क्रीडा स्पर्धांसह निबंध लेखन व चित्रकला स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांचा मुख्य उद्देश पोलीस दलाच्या शौर्य, त्याग व सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच पोलीस व जनतेमधील विश्वास अधिक दृढ करणे हा आहे.
सदर कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

.jpeg)
0 Comments