दक्षिण सोलापूर |हॅलो रिपोर्टर न्यूज: प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांनाही त्याचा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर पुणे येथील व्हीके ग्रुप यांच्या सीएसआर निधीतून आणि सस्टेनाबिलिटी इनिशिएटिव्हज यांच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर व वांगी येथील दोन जिल्हा परिषद शाळांमध्ये गरजाधारित सामाजिक प्रकल्प राबविण्यात आले.
वांगी येथील जिल्हा परिषद शाळेत पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तेथे जलशुद्धीकरण प्रकल्प (आरओ प्लांट) बसविण्यात आला. तर हत्तूर येथील जिल्हा परिषद शाळेतील किचन शेड अतिवृष्टीमुळे पूर्णतः खराब झाल्याने, तेथे नव्याने किचन शेड व स्टोअर रूम बांधून देण्यात आली.
या सामाजिक प्रकल्पांसाठी व्हीके ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधी संकलन करून या उपक्रमास मोलाचा हातभार लावला. दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन सस्टेनाबिलिटी इनिशिएटिव्हजचे अमोल उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्हीके ग्रुपच्या अपूर्वा कुलकर्णी म्हणाल्या, “गरजाधारित व परिणामकारक सामाजिक प्रकल्प राबविणे ही व्हीके ग्रुपची कायमची भूमिका आहे. शाळांची प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊनच हे प्रकल्प हाती घेण्यात आले.”
तर उद्घाटनप्रसंगी अमोल उंबरजे यांनी सांगितले, “आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सस्टेनाबिलिटी इनिशिएटिव्हज सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत आहे. सोलापूर जिल्ह्यातील या शाळांच्या गरजा ओळखूनच हा उपक्रम राबविण्यात आला.”
दोन्ही शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होणार असून, उपलब्ध सुविधांचा योग्य वापर केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच शाळांच्या गरजा ओळखून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ व पालकांनी व्हीके ग्रुपच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत आभार मानले.
या प्रकल्पासाठी मुख्याध्यापक सिद्धाराम गुरव, शिक्षक सतीश राठोड, मुख्याध्यापिका वसुधा हिप्परगे तसेच शिक्षक वामन धुळराव, वैशाली आठवले, मेघना पिंगळे आणि नम्रता पाठक यांनी समन्वय साधला. उद्घाटन सोहळ्यास ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









0 Comments