अक्कलकोट | तालुका प्रतिनिधी सतीश मनगुळे :– अक्कलकोट शहरात एक धक्कादायक घटना घडली असून सोलापूर येथील २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. प्राथमिक माहितीनुसार प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सदर तरुणी ही शिक्षणासाठी सध्या मैंदर्गी येथे आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास होती. ती आरोपी युवकासोबत अक्कलकोट येथील एका लॉजमध्ये थांबली होती. आज दुपारी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपी युवकाने लॉजच्या खोलीत धारदार शस्त्राने तरुणीचा गळा चिरून तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेनंतर आरोपी युवकाने स्वतःवर धारदार शस्त्राने गंभीर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून उपचारासाठी त्याला सोलापूर येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स तसेच इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास अक्कलकोट पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे अक्कलकोट परिसरात खळबळ उडाली असून तरुणीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
.jpeg)
0 Comments