सोलापूर/पुणे | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो येथील एका कुटुंबाने पुण्यातील बाणेर परिसरातील ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप करत, न्याय न मिळाल्यास 24 मार्च 2026 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.
तक्रारदार बाळासाहेब महादेव म्हस्के यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आरोग्यमंत्री तसेच पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिलेल्या लेखी अर्जात ही गंभीर बाब मांडली आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी रुग्णालयाने सुरुवातीला सुमारे 5.70 लाख रुपयांचे पॅकेज सांगितले होते. मात्र उपचारादरम्यान वारंवार शस्त्रक्रिया, आयसीयू उपचार आणि औषधांच्या कारणास्तव एकूण खर्च 13 लाख रुपयांपेक्षा अधिक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
शस्त्रक्रियेनंतरही रुग्णाची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच खालावली, तसेच रुग्णालय प्रशासनाकडून सतत अतिरिक्त पैशांची मागणी होत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. काही डॉक्टरांकडून रुग्ण व नातेवाईकांशी गैरवर्तन व शिवीगाळ झाल्याचाही गंभीर आरोप अर्जात नमूद करण्यात आला आहे.
तसेच, पैसे न भरल्यास उपचार बंद करण्याची व पोलीस कारवाईची धमकी देण्यात आल्याचा दावा देखील तक्रारदाराने केला आहे.
दरम्यान, या सर्व आरोपांबाबत संबंधित रुग्णालय प्रशासन किंवा डॉक्टरांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
तक्रारदाराने शासनाकडे उच्चस्तरीय समिती नेमून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, जबाबदारांवर कारवाई करावी तसेच झालेला खर्च परत मिळावा, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धती, उपचारांची पारदर्शकता आणि वाढत्या वैद्यकीय खर्चावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
(डिस्क्लेमर):
ही बातमी तक्रारदाराने केलेल्या आरोपांवर आधारित असून, संबंधित रुग्णालय किंवा डॉक्टरांची अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. चौकशीनंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल.


0 Comments