Advertisement

Breaking News
Loading...

रविवारचा चहा क्रमांक- २२३ "तू बदललीस" म्हणण्याआधी...!

 


रविवारचा चहा क्रमांक- २२३

"तू बदललीस" म्हणण्याआधी...!

एखाद्या संध्याकाळी, अगदी सहजपणे आपण हा आरोप करून मोकळे होतो. तू बदललीस. दोनच शब्द. पण या दोन शब्दांच्या मागे किती सहजता असते आणि किती मोठी टाळाटाळ असते, याचा आपण विचारच करत नाही. हे दोन शब्द बोलणे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या बदलाचा सगळा भार तिच्याच खांद्यावर टाकून आपण मोकळे होणे. 

पण खरंच ती बदलली असते का? की आपण तिला बदलायला भाग पाडलेले असते?

हा प्रश्न स्वतःला विचारायला धैर्य लागते. कारण त्याचे उत्तर आपल्याला आपल्याच वागण्याच्या आरशात उभे करते.

आपल्याला वाटते माणूस एका रात्रीत बदलतो. कालपर्यंत हसून बोलणारी व्यक्ती आज अचानक अबोल झाली. कालपर्यंत प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी करणारी व्यक्ती आज अनोळखी झाल्यासारखी वागते. आपल्याला हा बदल अचानक वाटतो.

पण अचानक काहीच घडत नाही.

एखादे झाड एका दिवसात सुकत नाही. त्याची पाने पिवळी पडण्याआधी कित्येक दिवस त्याच्या मुळांना पाणी मिळालेले नसते. तसेच असते माणसाचे. तिचा चेहरा सुकण्याआधी, तिचे डोळे थकण्याआधी, तिचे शब्द कमी होण्याआधी, तिच्या आतमध्ये खूप काही सुकलेले असते.

तिच्या बदलामागे एक दिवस नसतो, अनेक दिवसांचा साचलेला त्रास असतो. अनेक वेळा मनातच गिळून टाकलेले हुंदके असतात. अनेक वेळा "जाऊ दे, त्याला कळत नाहीये" म्हणून स्वतःलाच समजावलेले असते. अनेक वेळा आपल्याच अश्रूंना "काही नाही, डोळ्यात काहीतरी गेले" असे खोटे नाव दिलेले असते.

ती एका दिवसात बदलत नाही. ती रोज थोडी थोडी मरते आणि आपल्याला वाटते ती बदलली.

सुरुवातीला प्रेमात माणूस सगळं सहन करतो. कारण त्याला वाटते सहन करणे म्हणजेच प्रेम.

तुमची छोटी छोटी टोचून बोलणे ती दुर्लक्षित करते. तुम्ही रागाच्या भरात बोललेले कठोर शब्द तिच्या काळजाला लागतात, पण ती म्हणते, रागात बोलला असेल. तुम्ही दिवसभर साधा मेसेज केला नाही, तरी ती स्वतःला सांगते, कामात असेल. तुम्ही तिच्या आवडीच्या गोष्टींना हसण्यावारी नेले, तरी ती गप्प राहते.

ती प्रत्येक वेळी तुमच्यासाठी एक कारण शोधते. तुमच्या वागण्याला एक नाव देते. तुमच्या दुर्लक्षाला एक समजूत देते.

पण प्रत्येक समजुतीला एक मर्यादा असते. प्रत्येक दुर्लक्षाला एक वजन असते.

पहिल्यांदा ती भांडते. कारण तिला वाटते भांडलो तर कदाचित ऐकेल.

नंतर ती समजावून सांगते. शांतपणे, हात जोडून, डोळ्यात पाणी आणून.

नंतर ती रडते. एकटीच. कुणाला न सांगता. कारण तिला कळलेले असते की सांगून काही उपयोग नाही.

आणि मग ती शांत होते.

ही शांतता सर्वात भयानक असते. ही रुसण्याची शांतता नसते. ही संपल्याची शांतता असते. जिथे अपेक्षाच मरून गेलेली असते, तिथे शब्द कशाला हवेत? जेव्हा तिला कळते की आता काहीही बोललो तरी समोरच्याला फरक पडणार नाही, तेव्हा ती बोलणेच सोडून देते.

आणि नेमक्या याच क्षणी आपण म्हणतो, तू बदललीस. तू आता पूर्वीसारखी बोलत नाहीस.

आपल्याला वाटते माणूस प्रेम संपले म्हणून दूर जातो. पण खरे तर असे नसते.

माणूस प्रेम संपले म्हणून दूर जात नाही, तो सतत दुखावला गेल्यामुळे दूर जातो. तो स्वतःभोवती एक भिंत बांधतो. त्या भिंतीला आपण अहंकार म्हणतो, माज म्हणतो, बदल म्हणतो. पण ती भिंत अहंकाराची नसते, ती संरक्षणाची असते.

एकदा भाजलेला हात विस्तवापासून लांबच राहतो. तो विस्तवाचा द्वेष करत नाही, तो फक्त स्वतःला पुन्हा भाजू नये म्हणून जपतो. तसेच असते तिचे.

तिने तुमच्यावर प्रेम करणे थांबवलेले नसते, तिने स्वतःला दुखावून घेणे थांबवलेले असते. पूर्वी तुमच्या एका मेसेजची तासंतास वाट पाहणारी ती, आता तुमचा मेसेज पाहूनही लगेच उत्तर देत नाही. कारण तिला आता त्या वाट पाहण्याच्या वेदनेतून बाहेर पडायचे असते.

पूर्वी तुमच्या एका शब्दाने रडणारी ती, आता तुमच्या कठोर शब्दांवर फक्त हसते. कारण तिला कळलेले असते की अश्रूंना इथे किंमत नाही.

पूर्वी तिच्या मनातले सगळे तुमच्याशी शेअर करणारी ती, आता "काही नाही, सगळं ठीक आहे" असे म्हणते. कारण तिला कळलेले असते की मन मोकळे करूनही समोरून फक्त शून्य येते.

हा बदल स्वार्थ नाही, ही जगण्याची धडपड आहे. स्वतःला वाचवण्याची.

आपण अनेकदा नात्यात हिशोब मांडतो. मी तुझ्यासाठी हे केले, मी ते केले. पण नातं हिशोबाने टिकत नाही, ते जपणुकीने टिकते.

आपण कधी स्वतःला विचारतो का?

जिने प्रत्येक वेळी आपले मन जपले, तिचे मन आपण किती वेळा जपले?

जिने आपल्या चुका माफ केल्या, तिच्या छोट्या चुकांना आपण किती वेळा समजून घेतले?

जिने आपल्या शांततेमागचा थकवा ओळखला, तिच्या डोळ्यांमधली झोप न झालेली रात्र आपण कधी पाहिली?

नातं फक्त प्रेमाने टिकत नाही. प्रेमासोबत आदर लागतो. आदरासोबत संवाद लागतो. संवादासोबत समजूतदारपणा लागतो. आणि या सगळ्यापेक्षा जास्त, एकमेकांना जपण्याची तीव्र इच्छा लागते.

जर एक व्यक्ती सतत देत राहिली आणि दुसरी फक्त घेत राहिली, तर देणाऱ्याचे हात एक दिवस रिकामे होतातच. त्याचे मन थकते. मग आपण म्हणतो तू कंजूस झालीस. पण खरं तर देणारा रिकामा झाला असतो.

या जगातली सगळ्यात वेदनादायक गोष्ट कोणती असेल तर ती हीच. ज्या व्यक्तीला आपण सर्वात जास्त जीव लावला, तिच्यासमोरच एक दिवस आपल्याला आपल्या भावनांचे पुरावे द्यावे लागतात.

"मला फरक पडत नाही" हे वाक्य खूप सोपे वाटते. पण या वाक्याचा जन्म खूप कठीण असतो.

या वाक्याच्या पोटात एकेकाळचे "तू मला सोडून जाऊ नकोस" दडलेले असते.

या वाक्याच्या मागे "माझ्याशी थोडा वेळ बोल ना" अशा केलेल्या शेकडो विनवण्या असतात.

या वाक्याच्या मागे वाट पाहून थकलेले डोळे असतात आणि उत्तर न आलेले असंख्य मेसेजेस असतात.

जेव्हा मनाचं पात्र वारंवार रिकामं केलं जातं, तेव्हा एक दिवस ते पात्रच कोरडं होतं. मग त्यातून आवाज येत नाही. त्या निरव शांततेलाच आपण बदल म्हणतो.

म्हणून पुढच्या वेळी जेव्हा वाटेल की ती व्यक्ती बदलली आहे, तेव्हा तिच्यावर आरोप करण्याआधी थोडे थांबा.

तिच्या शांततेकडे लक्ष द्या. तिच्या शांततेत तुमच्या दुर्लक्षाचा आवाज आहे का ते ऐका.

तिच्या डोळ्यांकडे पहा. तिथे थकवा आहे की तुमच्या शब्दांनी दिलेल्या जखमा आहेत ते पहा.

तिच्या दूर जाण्याकडे पहा. ती दूर गेली आहे की तुम्हीच तिला ढकलत ढकलत इतके दूर नेले आहे की आता परत येण्याची तिच्यात ताकदच उरलेली नाही, याचा विचार करा.

"तू बदललीस" हे सांगणे खूप सोपे आहे. एका क्षणात बोलून मोकळे होता येते.

पण "तुला बदलायला मी कारणीभूत आहे का?" हा प्रश्न स्वतःला विचारायला खूप मोठे मन लागते. आणि ज्या दिवशी हे धैर्य आपल्यात येईल, त्या दिवशी कदाचित कोणालाच बदलावे लागणार नाही.

कारण ज्याला प्रेमाने जपले जाते, त्याला बदलण्याची गरजच पडत नाही. आणि ज्याला सतत दुखावले जाते, तो एक दिवस स्वतःला वाचवण्यासाठी नक्कीच बदलतो.

हेच तर नात्याचे अंतिम सत्य आहे.


प्रा. दिलीप आनंदराव जाधव, सांगली

राज्य कोषाध्यक्ष

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.



Post a Comment

0 Comments