सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | (दि. ८ मे २०२६): दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर दत्तात्रय मास्के उर्फ पप्पू याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने भारत-बांगलादेश सीमेवर अटक केली आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली.


दि. १ मे रोजी रात्री उशिरा जमिनीच्या व पैशाच्या वादातून आरोपीने गायत्री मास्के, प्रिया आणि शिवराज यांची तलवारीने हत्या केली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. तपासासाठी तीन विशेष पथके तयार करून सोलापूर तालुका पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला.

तपासादरम्यान आरोपीने महाराष्ट्रातून तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा मार्गे पश्चिम बंगालपर्यंत पळ काढल्याचे निष्पन्न झाले. तो बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला टाकी (ता. हासनाबाद, जि. उत्तर २४ परगणा) येथील एका लॉजमधून ताब्यात घेतले.


या कारवाईतील ठळक मुद्दे :

दि. १ मे रोजी बोरामणी येथे तिहेरी खून...

मुख्य आरोपीचा सुमारे २००० किमी पळ काढण्याचा प्रयत्न...

भारत-बांगलादेश सीमेवर अटक...

सोलापूर व पश्चिम बंगाल पोलिसांचा समन्वय...

CDR, फास्टॅग व LBS तंत्रज्ञानाचा वापर...

दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. राणी मास्के व दिक्षा मास्के यांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले, तर अन्य आरोपींना बोरामणी परिसरातून अटक करण्यात आली. एकूण सहा आरोपींना अटक झाली असून न्यायालयाने मुख्य आरोपीला १४ मेपर्यंत तर इतरांना ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून आंतरराज्यीय समन्वय व आधुनिक तपास पद्धतीचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!