Advertisement

Breaking News
Loading...

🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..! “मूर्ती लहान, कीर्ती महान” — तडजोडीतून घडलेला कर्तृत्वाचा ‘वजीर’ : तिमण्णा माने सरांचा प्रेरणादायी प्रवास...

 


🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..!


मूर्ती लहान, कीर्ती महान” — तडजोडीतून घडलेला कर्तृत्वाचा ‘वजीर’ : तिमण्णा माने सरांचा प्रेरणादायी प्रवास...


जीवनाच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात—काही क्षणभंगुर, तर काही आयुष्यभरासाठी मनात घर करून राहणारी. सोलापुरातील बाळीवेस येथील वडार समाज प्राथमिक शाळेचे वरिष्ठ लिपिक तिमण्णा माने सर हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक. कमी उंची असली तरी कर्तृत्वाची उत्तुंग उंची गाठणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा 36 वर्षांचा प्रदीर्घ सेवाप्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.


दि. 30 जून रोजी ते सेवानिवृत्त होत असून, त्यानिमित्त आणि 1 जुलैच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याला ही शब्दरूपी मानवंदना...!


 शैक्षणिक क्षेत्रातील अचूकतेचा आधारस्तंभ :

शालेय कामकाजातील गुंतागुंतीचे प्रस्ताव, सेवा पुस्तिका, वेतनश्रेणी, पेन्शन प्रकरणे किंवा वैद्यकीय बिले—कोणतेही काम असो, माने सरांनी ते नेहमीच अचूकतेने, वेळेत आणि प्रामाणिकपणे पूर्ण केले. त्यांच्या फाईलवर अधिकारी डोळेझाक करून सही करत, इतका विश्वास त्यांनी आपल्या कामातून निर्माण केला होता.


महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस तथा शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक रमेश चौगुले सर यांच्या शिफारशीने दि. 1 जून 1990 रोजी त्यांनी वडार समाज प्राथमिक शाळेत लिपिक पदावर रुजू होत आपल्या सेवाप्रवासाची सुरुवात केली.


सर्वांच्या सहकार्याने तब्बल 27 वर्षे शाळेत निष्ठेने सेवा बजावल्यानंतर दि. 1 डिसेंबर 2022 पासून वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद सोलापूर येथे प्रतिनियुक्तीवर लिपिक पदावर कार्यरत झाले. येथेही त्यांनी आपल्या कामाचा वेगळाच ठसा उमटवला. माने सर एखादी फाईल किंवा प्रस्ताव अधिकाऱ्यांकडे घेऊन गेले की काम पूर्ण होणार, याची खात्रीच असायची. त्यांच्या कामातील अचूकता, अभ्यासू वृत्ती आणि प्रामाणिकपणामुळे अधिकाऱ्यांचाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता.


“तडजोड हीच यशाची* *गुरुकिल्ली” 

माने सरांच्या जीवनाचा मुख्य आधार म्हणजे “तडजोड”.

ते नेहमी म्हणतात—

“तडजोड भिंतींचा खांब असतो; नात्यांचा भार पेलण्यासाठी ती भक्कम असायलाच हवी.”

बी.ए., बी.पी.एड. शिक्षण पूर्ण करूनही क्रीडाशिक्षक होण्याऐवजी लिपिक पद स्वीकारणे, कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणे, नात्यांमध्ये समजूतदारपणा राखणे—या प्रत्येक तडजोडीतूनच त्यांनी आयुष्य समृद्ध केले.


गरिबीतून घडलेला संघर्षमय प्रवास :

धाराशिव जिल्ह्यातील गडतावशी गावात दगड फोडणाऱ्या कष्टकरी आई-वडिलांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही “कमवा आणि शिका” हा मंत्र जपत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. संघर्ष, जिद्द आणि प्रामाणिक मेहनतीच्या बळावर त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.


 समाज, संघटना आणि सहकार क्षेत्रातील भरीव योगदान :

शैक्षणिक कार्याबरोबरच शिक्षक संघटना, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. अशासकीय शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदावरून त्यांनी अत्यंत निष्ठेने, पारदर्शकपणे आणि निस्वार्थ भावनेने कामकाज सांभाळले आहे.


त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना-


🏆 सावित्रीबाई फुले सेवाभावी लिपिक पुरस्कार...

🏆 साने गुरुजी सेवाभावी शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार...


यांसारख्या सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.


 कुटुंब आणि संस्कारांची जपणूक :

स्वतःच्या संघर्षमय आयुष्यातून मार्ग काढताना त्यांनी आपल्या तीनही अपत्यांना उत्तम शिक्षण देत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या संस्कारांची छाप त्यांच्या मुलांच्या यशात स्पष्टपणे दिसून येते.


 शेवटचा शब्द...

“मूर्ती लहान पण कीर्ती महान” या उक्तीचा प्रत्यय देणारे तिमण्णा माने सर म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील खरे ‘वजीर’.

त्यांची कार्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.


सेवापूर्ती आणि वाढदिवसानिमित्त तिमण्णा माने सरांना मनःपूर्वक शुभेच्छा..! 💐

                   ✍️...रवी देवकर



Post a Comment

0 Comments