दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे |
अंघोळीचे पाणी घेण्याच्या किरकोळ कारणावरून वृद्ध आईला मुलगा व सुनेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे घडली आहे. या प्रकरणी मंद्रूप पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी येथील सुमंगला गायगवळी या २४ जून रोजी घरासमोर अंघोळीचे पाणी घेण्यासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांचा मुलगा राजशेखर गायगवळी याने शिवीगाळ करत दगडाने त्यांच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर सून काजल गायगवळी हिनेही त्यांना खाली पाडून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यावेळी "घर सोडून निघून जा" अशी धमकी देत दोघांनीही सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप सुमंगला गायगवळी यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
या तक्रारीवरून मंद्रूप पोलिस ठाण्यात मुलगा राजशेखर गायगवळी व सून काजल गायगवळी यांच्या विरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.


0 Comments