Advertisement

Breaking News
Loading...

"नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही; मंद्रूप तहसीलदारांना आमदार सुभाष देशमुख यांचा सज्जड इशारा"


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ | शासनाच्या कामकाजात पारदर्शकता व गतिमानता आणण्याचा सरकारचा प्रयत्न असताना, नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत आमदार सुभाष देशमुख यांनी मंद्रूपच्या तहसीलदारांना थेट सुनावले. नागरिकांची कामे वेळेत न झाल्याने दलालांचे फावते असून ही परिस्थिती तातडीने बदलावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

"शेतकरी व नागरिकांची कामे जाणूनबुजून प्रलंबित ठेवली जातात. त्यामुळे लोक दलालांकडे जाण्यास भाग पडतात. शासन कार्यालयात दलाली सुरूच राहणार असेल तर त्या दलालांची नावे जाहीर करावीत का?" असा थेट सवाल आमदार देशमुख यांनी तहसीलदार व उपस्थित अधिकाऱ्यांना केला. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

यावेळी त्यांनी तहसीलदार, बीडीओ, तलाठी, मंडळ अधिकारी (सर्कल) व ग्रामसेवकांनी नागरिकांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा संबंधितांवर कारवाईची शिफारस करण्यात येईल, असा इशाराही दिला. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तालुक्यात वाढलेल्या अवैध वाळू, मुरूम व इतर गौणखनिज उत्खननाचा मुद्दाही आमदार देशमुख यांनी उपस्थित केला. अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी काही ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा महसूल बुडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तहसीलदारांनी अवैध उत्खनन रोखण्यासाठी तातडीने प्रभावी कारवाई करावी आणि दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.



Post a Comment

0 Comments