सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |
सोलापूर शहर गुन्हे शाखेने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत निवासी वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यासह एकूण 8 जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून दिव्यांग प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेतील गंभीर अनियमितता समोर आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. ऋत्विक देविदास जयकर यांच्या फिर्यादीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात असे उघड झाले की, अहिल्यानगर येथील कनिष्ठ लिपिक राजेश भाऊसाहेब जाधव याने सोलापूरचा रहिवासी नसतानाही बनावट आधारकार्ड तयार करून UDID ऑनलाइन प्रक्रियेद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले. या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत लाभ मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपीला अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणात निवासी वैद्यकीय अधिकारी, सिव्हिल हॉस्पिटलमधील वरिष्ठ लिपिक, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी आदींसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान बनावट आधारकार्ड तयार करण्यासाठी वापरलेले संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी वापरलेले संगणकही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
पोलीस तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली असून 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2026 या कालावधीत सिव्हिल हॉस्पिटलमधून 3,714 दिव्यांग प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली होती. त्यापैकी 8 प्रमाणपत्रे तज्ज्ञ डॉक्टरांच्या तपासणीशिवायच देण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून या संपूर्ण प्रक्रियेचा सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश खेडकर व गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या केली.




0 Comments