मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |
मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांच्या जागेत बदल करण्याच्या हालचालीविरोधात लाभार्थी आक्रमक झाले असून, मंगळवार (२९ जुलै) पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
लाभार्थ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पीएम आवास योजनेतील ४८ घरकुलांसाठी पूर्वी मंजूर ले-आऊट प्लॅननुसार जागेचा ताबा देण्यात आला होता. त्यानुसार अनेक लाभार्थ्यांनी बांधकामालाही सुरुवात केली आहे. मात्र, काही व्यक्तींच्या तक्रारीनंतर या जागेत बदल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.
दरम्यान, आमदार राजू खरे यांनीही १३ जुलै २०२६ रोजी तहसीलदारांना पत्र देऊन मंजूर ले-आऊटमध्ये कोणताही बदल करू नये व लाभार्थ्यांना देण्यात आलेला जागेचा ताबा कायम ठेवावा, अशी मागणी केली आहे.
लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की, जागा बदलल्यास त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून प्रशासनाने पूर्वीचा निर्णय कायम ठेवावा. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.


0 Comments