दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |
सांगोला येथील फॅबटेक एज्युकेशन व फॅबटेक इंडस्ट्रीजचे मालक भाऊसाहेब आनंदा रुपनर यांनी शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता त्यांच्या नावावर कर्ज काढून फसवणूक केल्याचा आरोप करत होनमुर्गी येथील नऊ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलला भेट देत आपली व्यथा मांडली. यावेळी शेतकऱ्यांनी फॅबटेक कंपनीच्या मालकांना थेट विनंती करत, “शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेली कर्जे तात्काळ त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करावीत आणि शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून लवकरात लवकर बाहेर काढावे,” अशी मागणी केली.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नावावर कर्ज असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्यासमोर आर्थिक व मानसिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात शेतकऱ्यांना दिलासा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर यांनी दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पत्र पाठवून अर्जदारांच्या निवेदनाचे अवलोकन करून नियमानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती अर्जदारांना देण्यास सांगण्यात आले आहे.
आता या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून कोणती चौकशी व कार्यवाही केली जाते, तसेच शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या कथित कर्जाबाबत फॅबटेक व्यवस्थापनाकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.


0 Comments