Advertisement

Breaking News
Loading...

वळसंगमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगडफेकीने परिसरात तणाव... काठ्या, कोयते, लोखंडी रॉडचा वापर; २ जण गंभीर जखमी, १५ जणांवर गुन्हा दाखल; ४ मुख्य आरोपी ताब्यात...

 


दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे जुन्या वादातून दोन गट आमनेसामने येत तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे वळसंग परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही गटांमध्ये पूर्वीपासून वाद आणि पूर्ववैमनस्य होते. याच जुन्या वादातून दोन्ही गटांमध्ये पुन्हा वादाला सुरुवात झाली. सुरुवातीला झालेली शाब्दिक चकमक पाहता पाहता हिंसक हाणामारीत परिवर्तित झाली.

वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही बाजूंकडून काठ्या, कोयते आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या या राड्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दगडफेकीत काही दुकाने आणि घरांनाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.

या तुंबळ हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत जखमी अयान तांबोळी आणि मोहसीन फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना घटनेबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि पुढील अनर्थ टाळला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार मुख्य आरोपींना ताब्यात घेतले असून, इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, वळसंग गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments