पुणे (प्रतिनिधी) :- अँटी करप्शन ब्युरो, पुणे परिक्षेत्राने 25 नोव्हेंबर 2025 रोजी धडक कारवाई करत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब भगवान मिरगणे (वय 57) यांना 1 लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बंडगार्डन पोलीस ठाणे अंतर्गत करण्यात आली असून आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
56 वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नी सोलापूर जिल्ह्यातील एका माध्यमिक शाळेत 2016 पासून विना वेतन सेवा बजावत आहेत. शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर वेतन सुरू होणार असल्याने तक्रारदारांनी 16 जून 2025 रोजी प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाखल केला होता.
हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आरोपी उपनिरीक्षक मिरगणे यांनी 1 लाख रुपयांची लाच मागितली अशी तक्रार 17 नोव्हेंबर रोजी ACB कडे नोंदवली. त्याच दिवशी मागणी पडताळणी, 21 नोव्हेंबर रोजी सुबोध पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत मिरगणे यांनी लाच मागणीची पुष्टी केली आणि स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
आज, 25 नोव्हेंबर रोजी सायं. 6:21 वाजता, ACBच्या सापळ्यात आरोपीने स्वतःच्या केबिनमध्ये पंचासमक्ष 1 लाख रुपये स्वीकारताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:•
• सापळा अधिकारी: श्री. प्रसाद लोणारे, पोलीस निरीक्षक
• तपास अधिकारी: श्री. सतीश वाळके, सहायक पोलीस आयुक्त
• मार्गदर्शन: श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उप आयुक्त
अँटी करप्शन ब्युरोने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्क व्यतिरिक्त कुणीही लाच मागत असल्यास खालील माध्यमांद्वारे तक्रार नोंदवावी:
📞 020-26122134 / 9403781064
📲 व्हॉट्सअॅप : 9403781064 / 9930997700
शिक्षण विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या या प्रकरणामुळे वेतनासाठी तब्बल 9 वर्षे प्रतीक्षा करणाऱ्या शिक्षकाकडून लाच मागणे अत्यंत निंदनीय असल्याची तीव्र प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे.

0 Comments