विंचूर (ता. दक्षिण सोलापूर) : दारूच्या व्यसनातून निर्माण झालेल्या तणावामुळे एका 27 वर्षीय युवकाने शेतातील वस्तीवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार आण्णाराव बिराजदार (वय 27, रा. विंचूर) हा कुटुंबासोबत राहून शेती व्यवसाय करत होता. त्याचे लग्न सन 2023 मध्ये झाले होते. मात्र दारूच्या व्यसनामुळे गेल्या दीड वर्षांपासून त्याची पत्नी माहेरी राहात असल्याने तो मानसिक तणावात होता.
रविवारी दुपारी त्याचा भाऊ अमोल बिराजदार गुरे चारण्यासाठी शेतात गेला असताना राजकुमार वस्तीवर एकटाच होता. दुपारी सुमारास जेवण केले का हे पाहण्यासाठी अमोल वस्तीवर परत आला असता, राजकुमार हा जनावरांच्या शेडमधील पत्र्याच्या लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. अमोलने तत्काळ दोरी कापून त्याला खाली उतरवले व नातेवाईकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय, मंद्रूप येथे घेऊन गेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
या घटनेची नोंद मंद्रूप पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस हवालदार मुलाणी अधिक तपास करत आहेत. मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी विनंती मृताच्या भावाने पोलिसांना दिलेल्या खबरी जबाबात केली आहे.
या दुर्देवी धात्नेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कौटुंबिक तणाव व व्यसनाधीनतेमुळे बिघडलेल्या आयुष्याचे आणखी एक उदाहरण ठरले आहे.

0 Comments