सोलापूर (प्रतिनिधी) :- हैदराबाद रोडवरील मुळेगाव फाटा, सग्गम नगर परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात ७९ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेला १५ वर्षीय नातू थोडक्यात बचावला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
मृताचे नाव दुब्बराजम नरसय्या गोसकी (वय ७९, रा. कुमार स्वामी नगर, शेळगी) असे असून त्यांचा नातू दिनेेश श्रीनिवास गोसकी (वय १५) किरकोळ जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे जुना विडी घरकुल परिसरातून दुचाकी (एमएच १३ एच ८२२१) वरून शेळगीकडे जात होते. मुळेगाव क्रॉस रोडवर रस्ता पार करत असताना हैदराबादवरून सोलापूरकडे भरधाव वेगात येणाऱ्या हटकेश्वर सिमेंट कंपनीच्या मालवाहतूक वाहनाने (एमएच १२ एमव्ही १२७७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक एवढी जबरदस्त होती की दुब्बराजम गोसकी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही क्षणांतच नागरिकांची गर्दी जमली. त्याचवेळी उपस्थित पत्रकार अजमेर शेख यांनी कंट्रोल रूम १०० आणि रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.
लवकरच ऍम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी हलवला. जखमी मुलाला प्राथमिक उपचार देण्यात आले. घटनेनंतर नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध पुढील तपास सुरू केला आहे.



0 Comments