Advertisement

Breaking News
Loading...

बरुरमध्ये दुर्दैवी घटना : १७ वर्षीय वैष्णवीचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू...

 


बरुर (ता. दक्षिण सोलापूर) – 23 नोव्हेंबर 2025 : बरुर गावात रविवारी सकाळी अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. वैष्णवी मल्लिकार्जुन चौधरी (वय वर्षें 17) ही अल्पवयीन मुलगी शेजारील शेतातील पाण्याच्या हौदात पडून मृत झाल्याची घटना रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास समोर आली.


वैष्णवी ही सध्या कर्नाटक राज्यात इयत्ता 11 वी (सायन्स)चे शिक्षण घेत होती. शाळेला सुट्टी असल्याने ती दोन दिवसांपूर्वी बरुरला घरी आली होती. काल दिवसाभरात तिचे आई-वडील द्राक्षबागेत काम करण्यास गेले असताना ती घरी एकटीच होती. सायंकाळी कामावरून परतल्यानंतर ती घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला; मात्र ती कुठेही सापडली नाही.


आज रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली असता अमर रतिकांत पाटील यांच्या शेतातील मोठ्या पाण्याच्या हौदामध्ये एक मृतदेह तरंगताना दिसला. नातेवाईकांनी तातडीने बाहेर काढून पाहिले असता ती वैष्णवी असल्याचे निश्चित झाले. तत्काळ तिला ग्रामीण रुग्णालय, मंद्रुप येथे नेण्यात आले; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.


घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसून "अज्ञात कारणावरून हौदात पडून बुडणे" अशी प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ग्रेड पीएसआय काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


या दुर्दैवी घटनेमुळे बरुर गावात शोककळा पसरली असून चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

0 Comments