🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..!
सोलापूर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: नामदेवराव भालशंकर गौरव समितीच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार’ शंकर (अण्णा) चौगुले यांना जाहीर झाल्याबद्दल, रवी देवकर यांनी दिलेल्या शब्दशुभेच्छा…
भूषवलेली पदे :
▶️ चेअरमन – सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन, महाराष्ट्र राज्य, सोलापूर
▶️ संस्थापक अध्यक्ष – बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सोलापूर
▶️ राज्य उपाध्यक्ष – मी वडार महाराष्ट्राचा
▶️ चेअरमन – जनकल्याणकारी नागरी सहकारी पतसंस्था
▶️ सेक्रेटरी – वडार ज्ञाती संस्था, सोलापूर
▶️ सचिव – श्री रूपाभवानी खाण मालक संघटना
▶️ माजी सिनेट सदस्य – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
महाराष्ट्रात, विशेषतः सोलापूर जिल्ह्यात वडार समाजाचा कोणताही कार्यक्रम असो त्यामध्ये शंकर (अण्णा) चौगुले हे उत्साहाने, तसेच तन-मन-धनाने सहभागी होताना मी अनेक वेळा पाहिले आहे. प्रेमाने जोडलेली चार माणसे आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द- हेच खरे वैभव! हीच खरी श्रीमंती शंकर अण्णा चौगुले यांच्याकडे आहे.
शंकर अण्णा यांनी गेंटयाल चौक परिसरातील मनपाच्या प्राथमिक शाळेत शिक्षणाची पहिली पायरी चढली. त्यानंतर त्यांनी नॉर्थकोर्ट प्रशालेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. अण्णांच्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने नवी उभारी मिळाली ती हरिभाई देवकरण ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना. याच ठिकाणी संघर्ष, संघटन आणि नेतृत्वगुणांची खरी कसोटी लागली.
हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात जी.एस. (विद्यार्थी प्रतिनिधी) पदासाठी त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथेही त्यांनी विद्यापीठ प्रतिनिधी पदासाठी निवडणूक लढवून यश संपादन केले. पुढे शिवाजी विद्यापीठाच्या नऊ सदस्यीय सिनेट समितीवरही निवडणुकीद्वारे निवडून आले. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही ते निवडून आले.
एम.कॉम. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अण्णांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देण्याचा निर्धार केला. एमआयडीसी परिसरातील सुनील नगर येथील गरीब व कामगार वस्तीतल्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी २००४ साली श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळच्या माध्यमातून महात्मा विद्या मंदिर ही शाळा सुरू केली. येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले.
या परिसरातील विद्यार्थ्यांचे शिक्षण दहावीपर्यंत खंडित होऊ नये म्हणून पुढे सोमनाग प्रशाला सुरू करून दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. काळाची गरज ओळखून पूर्व भागातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रिसिजन इंग्लिश मिडियम स्कूल सुरू आहे. तसेच नवी विडी घरकुल, गोदुताई परुळेकर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नवनीत मराठी विद्या मंदिर सुरू करून शैक्षणिक सोय करण्यात आली आहे. हे सर्व सामाजिक व शैक्षणिक कार्य करत असताना अण्णांनी आपल्या बिल्डर व खाण व्यवसायाकडेही दुर्लक्ष केले नाही. २०१२ साली विडी घरकुल सारख्या कामगार वस्तीलगत १२४ प्लॉट्स व ३६ शॉपिंग मॉल्सचा ‘एस.एस. आयकॉन’ हा भव्य गृहप्रकल्प साकार करून पूर्व भागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला. सध्या विजापूर रोड, पुणे रोड या भागात प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू आहे.
शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रासोबतच अण्णांनी
विविध सामाजिक, ज्ञाती संस्था व संघटनांमधून समाजसेवक म्हणून सातत्याने कार्यरत आहेत. मी वडार महाराष्ट्राचा या सामाजिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांनी असंख्य सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले. गेल्या २५ वर्षांपासून मोफत सामुदायिक विवाह सोहळे, वधू–वर व पालक परिचय मेळावे, रक्तदान शिबिरे, गुणवंत विद्यार्थी सत्कार, शासकीय व निमशासकीय अधिकारी सन्मान सोहळा, आरोग्य शिबिरे, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, दहीहंडी महोत्सव, तसेच गरजू व दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत...अशा असंख्य उपक्रमांमध्ये अण्णांचे मोलाचे योगदान आहे. मड्डी वस्ती येथील ५१ फुटी हनुमान गडाच्या निर्मितीत अण्णांचा सिंहाचा वाटा आहे.
राजकारणातही अण्णांनी सोलापूर शहर मध्यचे तत्कालीन शिवसेना आमदार शिवशरण (अण्णा) पाटील यांचे निवडणूक प्रचार प्रमुख व सहायक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. सहकार क्षेत्रात सोलापूर मजूर सहकारी संस्था व राज्य फेडरेशन मजूर सहकारी संस्थेत संचालक म्हणून त्यांनी तब्बल 25 वर्षे सेवा दिली. विविध विभागांतून १०० हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. तब्बल 25 वर्षांनंतर सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या चेअरमनपदी त्यांची निवड झाली. हा त्यांच्या कार्याचा 'मुकुटावरील सोन्याचा तुरा' ठरतो. या सर्व प्रवासात त्यांना त्यांची पत्नी सहशिक्षिका शारदा (मॅडम) तसेच उच्चशिक्षित पुत्र सौरभ, अमर व नागराज यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
सोलापूरच्या राजकारणात व समाजकारणात प्रसन्न व्यक्तिमत्त्व, सात्विक वृत्ती आणि मिळालेल्या संधीचे सोने करणारी जी नेतेमंडळी आहेत, त्यात शंकर अण्णा चौगुले यांचे नाव अग्रभागी आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व एका ओळीत सांगायचे झाल्यास.... “काटे नसलेला गुलाब ” या उपमेइतके चपखल वर्णन क्वचितच सापडेल.
शंकर सोमण्णा चौगुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सहकार, औद्योगिक व राजकीय क्षेत्रातील बहुआयामी व उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज उद्योगरत्न पुरस्कार’ प्रदान करताना नामदेवराव भालशंकर गौरव समितीला मनापासून अभिमान वाटत आहे.!
- - रवि देवकर



0 Comments