मुंबई (हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी): राज्यात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने कडक भूमिका घेतली असून, यापुढे अशा पदार्थांची विक्री किंवा साठवणूक आढळून आल्यास संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.
मंत्री झिरवाळ यांच्या निर्देशानुसार याबाबत कठोर परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात बंदी असलेले अन्नपदार्थ आढळून आल्यास त्या क्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सामूहिकपणे जबाबदार धरले जाणार असून, त्यांच्यावर शिस्तभंगाची तसेच प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनीही या कारवाईला अधिक धार देत राज्यातील सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. गुटखा, पानमसाला व अन्य प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने होणारी विक्री, अवैध साठवणूक तसेच वाहतूक यावर तात्काळ व प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही अनेक ठिकाणी गुप्तपणे विक्री सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर आता एफडीएने थेट अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केल्यामुळे गुटखाविरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांबरोबरच त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई होणार असल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
.jpeg)

0 Comments