सोलापूर (हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी): सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्ध व दुर्बल नागरिकांना लक्ष्य करत फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा व आंतरराज्य सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईत एकूण दोन गुन्हे उघडकीस आले असून सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस असल्याची बतावणी करून फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत होते.
दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूर-तुळजापूर रोड परिसरात संशयित येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील व त्यांच्या पथकाने सापळा रचून कंबर रहिम मिर्जा (वय ३९, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार जाकीर युसुफ खान याच्यासह मोटारसायकल वापरून गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपीविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गु. र. नं. ६०७/२०२५, कुर्डुवाडी पोलीस ठाणे गु. र. नं. ३९७/२०२५ असे गुन्हे दाखल असून, त्याच्याकडून २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोबाईल हँडसेट असा एकूण १.६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, अटक आरोपीवर यापूर्वी पुणे, धुळे, नाशिक, जालना तसेच गुजरात, कर्नाटक व केरळ राज्यात जबरी चोरी, पोलीस बतावणी व फसवणुकीचे एकूण १६ गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.


0 Comments