नांदणी| दक्षिण तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
नांदणी आरटीओ चेकपोस्टवरील लाचखोरी प्रकरणात मोठा निर्णायक टप्पा आला असून सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने लाचखोर मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ आणि खासगी इसम अमोल अप्पासाहेब पाटील यांना दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बेकायदेशीर अटकेचा अर्ज न्यायालयाने फेटाळत दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
काल दि. 25/12/2025 रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या या दोन्ही आरोपींना सोलापूरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. कटारीयासाहेब यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. आरोपींच्या वकिलांनी अटक बेकायदेशीर असून अटकेची कारणे सांगितली नसल्याचा दावा करत तात्काळ मुक्ततेचा अर्ज दाखल केला होता.
यावेळी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. डॉ. प्रदीपसिंह मो. राजपूत यांनी जोरदार युक्तिवाद सादर केला. त्यांनी न्यायालयास सांगितले की, खासगी इसम अमोल पाटील याने मूळ फिर्यादीकडे ३,००० रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती २,५०० रुपये स्वतःसाठी व आरटीओ निरीक्षक तानाजी धुमाळ यांच्यासाठी स्वीकारले. या लाच स्वीकारण्याच्या वेळी जालना एसीबी पथकाने सापळा रचून दोघांनाही रंगेहाथ पकडले असून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम ७अ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करताना आरोपीच्या मित्रांना माहिती देण्यात आली असून आरोपींना नोटीस बजावून अटकेची कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्थींचे पालन करण्यात आल्याचेही सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
याशिवाय, नांदणी चेकपोस्टवर आणखी किती खासगी इसमांच्या माध्यमातून लाच उकळली जात होती, किती रक्कम गोळा करण्यात आली याचा सखोल तपास आवश्यक असल्याने आरोपींची पोलिस कोठडी अत्यावश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींचा बेकायदेशीर अटकेतील मुक्ततेचा अर्ज फेटाळला आणि दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील ॲड. डॉ. प्रदीपसिंह मो. राजपूत, आरोपीतर्फे ॲड. निलेश जोशी, तसेच तपासी अंमलदार म्हणून पोलीस उपअधीक्षक श्री. प्रशांत चौगुले यांनी काम पाहिले.
आरटीओतील लाचखोरीच्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 Comments