मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज|प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: येथील युवकांना स्पर्धा परीक्षा व शासकीय सेवांसाठी सक्षम घडविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘द ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आदरणीय कोरे मालक व तेरा मैलचे सरपंच निखिल राठोड यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत यावे, यासाठी अशा प्रशिक्षण संस्थांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा व शिस्तबद्ध तयारीची संधी ‘द ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’ देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रशिक्षण केंद्रामध्ये एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, स्टाफ सिलेक्शन आयोग यांसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी अनुभवी मार्गदर्शकांच्या माध्यमातून दर्जेदार प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यावेळी अरमान तिकोटी यांनी अकॅडमीच्या अभ्यासक्रमाची माहिती देताना सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासपद्धती, नियमित चाचण्या, मार्गदर्शन वर्ग व वैयक्तिक समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
उद्घाटन समारंभास ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या कार्यालयामुळे मंद्रूप व परिसरातील विद्यार्थ्यांना शहरात न जाता दर्जेदार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



0 Comments