कंदलगाव | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर | मोबाईल हरवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका वीटभट्टी कामगाराचा खून झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव शिवारात घडली. बुदाप्पा तिपण्णा देसाई (वय ४०, मूळ रा. शेषगिरी, ता. अफजलपूर, जि. गुलबर्गा) असे मृत कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी संजय परशुराम धरेनवर याला मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर रोजी बुदाप्पा देसाई आणि संजय धरेनवर हे दोघे दारू पिण्यासाठी बाहेर गेले होते. यावेळी संजयचा मोबाईल हरवला. हा मोबाईल बुदाप्पाने घेतल्याचा संशय संजयने व्यक्त केला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. बुदाप्पाने संजयला मारहाण केल्याने त्याच्या मनात राग होता.
याच रागातून २५ ऑक्टोबरच्या रात्री साडेआठ ते २६ ऑक्टोबरच्या पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान कंदलगाव शिवारातील दीक्षित वीटभट्टीवर झोपलेल्या बुदाप्पाच्या डोक्यात हत्याराने वार करून त्याचा खून केल्याची फिर्याद मृताची पत्नी रूपा देसाई यांनी दिली आहे.
या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांनी गुन्हा दाखल केला असून, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक शिंदे पुढील तपास करीत आहेत.


0 Comments