कारकल | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथे शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
श्रवण संतोषकुमार अंकलगी (वय १५) व श्रावणी संतोषकुमार अंकलगी (वय १०) अशी मृत्यू झालेल्या बहीण-भावांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संतोषकुमार अंकलगी यांचे काही वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले होते. त्यामुळे आई उषा अंकलगी या आपल्या आई महादेवी कोळी व दोन्ही मुलांसह कारकल येथील शेतात वास्तव्यास होत्या.
रविवारी उषा अंकलगी कामानिमित्त सोलापूर येथे गेल्या होत्या. शाळेला सुट्टी असल्याने श्रवण हा विंचूरहून कारकलला घरी आला होता. दुपारी सुमारास श्रवण व श्रावणी हे दोघे शेतातील शंभर बाय शंभरच्या तळ्यात पोहण्यासाठी गेले. पाण्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी झाडाला दोरी बांधून ती कमरेला अडकवली होती. मात्र दुर्दैवाने दोरी झाडाला सुटल्याने दोघांचा ताळमेळ सुटला आणि ते पाण्यात बुडू लागले.
बराच वेळ मुलांचा आवाज न ऐकू आल्याने आजी महादेवी कोळी यांनी शेततळ्याकडे धाव घेतली असता दोघेही पाण्यात बुडत असल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यावर शेतमालक विद्यानंद वालीकर तसेच शेजारील मल्लीकार्जुन सोनगी व महादेव कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शेततळ्यात उडी मारून दोघांना बाहेर काढले. मात्र ते बेशुद्ध अवस्थेत होते.
त्यानंतर त्यांना तात्काळ मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार विठ्ठल बिराजदार करीत आहेत.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments