मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर | मंद्रूप येथे ग्रामदैवत पीर शेख साहेब व शेख सालार उर्स (यात्रा) निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या उर्सानिमित्त गुरुवारी रात्री संगीत (संदल) मिरवणूक व कलंगी तुन्याचे पारंपरिक कार्यक्रम पार पडणार आहेत. सुप्रसिद्ध गायक बसराज अंबवाणा तलवार व दुग्गेदी गीगी गायन संघ यांचे सादरीकरण होणार आहे. शुक्रवारी सकाळीही कलंगी तुन्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दिवसभर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.


शनिवारी सकाळी विशेष आकर्षण ठरणाऱ्या भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नामांकित पैलवानांच्या उपस्थितीत रंगणाऱ्या या कुस्त्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. विजेत्या पैलवानांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून ग्रामपंचायत, यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला आहे. उर्स सोहळ्यामुळे मंद्रूप गावात धार्मिक एकात्मता व क्रीडाप्रेमाचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे.