मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पोलीस स्टेशन हद्दीत बालविवाहा सारख्या गंभीर सामाजिक गुन्ह्यांविरोधात मंद्रूप पोलिसांनी कडक भूमिका घेत प्रभावी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राज डांगे तसेच बालकल्याण पथकाने अवघ्या एका आठवड्यात दोन बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे.
गुप्त माहिती व स्थानिकांकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित कुटुंबीयांना कायद्याची जाणीव करून दिली. बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देत दोन्ही विवाह तत्काळ थांबविण्यात आले.
या धाडसी आणि संवेदनशील हस्तक्षेपामुळे दोन अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे. ग्रामीण भागात परंपरा, सामाजिक दबाव आणि अज्ञानामुळे अजूनही बालविवाहाच्या घटना घडताना दिसतात. मात्र मंद्रूप पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि सामाजिक बांधिलकी ही इतरांसाठी आदर्श ठरत आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांविषयी विश्वास आणि आदर अधिक वाढला असून नागरिकांकडून मंद्रूप पोलिसांचे कौतुक होत आहे.
“बालविवाह हा केवळ कायद्याचा भंग नसून मुलांच्या भविष्यावर घाला आहे. अशा प्रकारांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही,” असा इशारा पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी दिला आहे.
ही उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत मंद्रूप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप काशीद, सहा. फौजदार बापू शिंदे, पोलीस हवालदार शहानुर मुलानी, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, ज्ञानेश्वर भोसले, विशाल कर्नाळकर तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल सविता चव्हाण यांनी सहभाग घेतला.
या कार्यामुळे दोन निष्पाप आयुष्यांना नवसंजीवनी मिळाली असून समाज परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

0 Comments