रविवारचा चहा क्रमांक- २०४
"अदृश्य गाठ...!!"
माणसाच्या आयुष्यातील नाती एखाद्या वेलीसारखी असतात. काही वेलींना रोज पाणी लागते, तर काही पावसाच्या एका सरीवरही वर्षानुवर्षे हिरवीगार राहतात. आजच्या धावपळीत जवळच्या माणसांना भेटणे कठीण झाले असले, तरी प्रत्यक्ष भेटीपेक्षा नात्यांची 'अतूट गाठ' बसणे अधिक महत्त्वाचे आहे.
नात्याची खोली भेटींच्या संख्येवर नसते. खरं तर, नातं फोटोंमध्ये एकत्र दिसण्यापेक्षा एकमेकांच्या विचारांत आणि विश्वासात असण्यावर जास्त अवलंबून असतं.
काही नात्यांत हाक मारण्याचीही गरज नसते. आपण आपापल्या व्यापात असलो, तरी अस्वस्थतेत किंवा आनंदाच्या क्षणी आपसूकच त्या व्यक्तीची आठवण येते. तिथे प्रत्यक्ष भेटीपेक्षा एकमेकांच्या अस्तित्वाची दखल महत्त्वाची असते. हीच ती अतूट गाठ, जी भौगोलिक अंतरामुळे कधीच सैल पडत नाही.
माझ्या अनुभवात अशी काही माणसं आहेत, ज्यांच्याशी संवाद महिनाभराऐवजी वर्षांनी झाला तरी तो इतका सहज असतो की जणू कालच भेटलो होतो. तिथे "कुठे होतास?" हा जाब नसतो, तर "कसा आहेस?" ही काळजी असते. रेशमी धाग्यासारखी ही गाठ नाजूक असली तरी ती तोडणे अशक्य असते.
प्रत्यक्ष भेट न होणे ही परिस्थिती असू शकते, पण दुरावा येणे हा स्वभाव असतो. जिथे अतूट गाठ असते, तिथे संशयाला जागा नसते. "तो भेटला नाही म्हणजे बदलला" अशा विचारापेक्षा, "तो जिथे असेल तिथे माझाच आहे" हा विश्वास नात्याला जिवंत ठेवतो.
कधीकधी जुन्या समृद्ध क्षणांच्या शिदोरीवर पुढची अनेक वर्षे भेटीशिवाय काढता येतात. मग तो जुन्या मित्राचा फोन असो किंवा लांब राहणाऱ्या भावंडांची माया; ही नाती भेटीच्या पलीकडे जाऊन मनाच्या गाभाऱ्यात स्थिरावलेली असतात.
नात्याची ही गाठ टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा आणि एकमेकांच्या वेळेचा आदर आवश्यक आहे. भेट झाली तर उत्तमच, पण भेट न होताही मनाची ओढ कायम राहणे हेच खऱ्या नात्याचे यश आहे. माणसं जोडण्यापेक्षा ती गाठ आयुष्यभर जपून ठेवणे हीच खरी साधना आहे.
प्रा. दिलीप आनंदराव जाधव, सांगली
सचिव
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना,सांगली.
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.

0 Comments