सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | (दि. २३ मे २०२६) – आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज, अभ्यासू व संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक प्रवीणदादा निकाळजे यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीत शोककळा पसरली आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी कुमठा नाका येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच निकाळजे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
प्रवीणदादा निकाळजे हे अभ्यासू, निर्भीड आणि लढवय्या नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांचे ते विश्वासू सहकारी होते. समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवत वंचित आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर निःस्वार्थपणे संघर्ष केला.
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सत्य आणि न्यायासाठी ठाम भूमिका घेण्याची त्यांची परंपरा होती. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळ, काँग्रेस पक्ष आणि सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
या प्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, तसेच अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस परिवाराने निकाळजे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत “या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
प्रवीणदादा निकाळजे यांचे कार्य, जिद्द आणि समाजाप्रती असलेली निष्ठा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!



0 Comments