सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दिनांक : १६ मे २०२६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावश्यक परदेश दौरे टाळण्याचे केलेले आवाहन, नागरिकांचा विरोध आणि स्थानिक स्तरावर व्यक्त करण्यात आलेल्या आक्षेपांनंतरही सोलापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित डेन्मार्क दौऱ्यावर अधिकारी व पदाधिकारी ठाम असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता हा वाद आणखी तीव्र झाला आहे. सर्वसामान्य सोलापूरकरांनी थेट पंतप्रधान कार्यालय (PMO), केंद्रीय गृहमंत्रालय आणि CISF यांना ई-मेल पाठवून हा दौरा तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे.
सोलापूरकरांनी आपल्या ई-मेलमध्ये नमूद केले आहे की, देशाच्या आर्थिक आणि जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना अनावश्यक परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर देशभरातील अनेक मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःचे दौरे रद्द किंवा पुढे ढकलले. मात्र सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते आणि इतर प्रतिनिधी हे डेन्मार्क दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
या संदर्भात नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरातून ई-मेल व निवेदने देऊन दौरा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच हा अभ्यास ऑनलाइन पद्धतीने, वेबिनार किंवा व्हर्च्युअल परिषदेद्वारे सहज शक्य असताना प्रत्यक्ष परदेश दौऱ्याची आवश्यकता काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
सोलापूर शहरात आजही रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक कोंडी आणि अपूर्ण विकासकामे यांसारख्या अनेक मूलभूत समस्या प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत करदात्यांच्या पैशातून परदेश दौरे करणे हे जनतेच्या भावना दुखावणारे आहे.
सोलापूरकरांनी PMO, केंद्रीय गृहमंत्रालय आणि CISF यांना या दौऱ्याची आवश्यकता, मंजुरी प्रक्रिया, खर्च, पारदर्शकता आणि ऑनलाइन पर्यायांचा विचार झाला होता का याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रहित, आर्थिक शिस्त आणि पंतप्रधानांच्या आवाहनाचा सन्मान राखण्यासाठी हा दौरा थांबवावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, या विषयावर सोलापूरमध्ये राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र चर्चा सुरू झाली असून नागरिकांमध्येही संतापाची भावना व्यक्त होत आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!


0 Comments