मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | शिरापूर (सो.), ता. मोहोळ येथील रहिवासी अनिल आबाजी पाटील यांच्या घरासमोरून रविवारी मध्यरात्री दोन शेळ्या व एक बोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या चोरीत सुमारे ₹60 हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले असून, याप्रकरणी ते मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल पाटील यांनी सांगितले की, एका शेळीची किंमत सुमारे ₹20 हजार असून दोन शेळ्या व एका बोकडासह एकूण ₹60 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांना अटक करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी मोहोळचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, "ते धाडसी व कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांच्या नेतृत्वाखाली चोरट्यांचा लवकरच शोध लागेल, असा आमचा पूर्ण विश्वास आहे," असे सांगितले.
अनिल पाटील यांनी मोरवंची येथे सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर राज्यातील कामगार आले असल्याचा उल्लेख करत, सर्व कामगारांचे पोलीस पडताळणी (Police Verification) झाले आहे का, याची सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांनी यापूर्वीही यासंदर्भात निवेदन दिले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही केला.
तसेच परिसरात मोटार केबल चोरीसह इतर लहान-मोठ्या चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याचा दावा करत, अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, बाहेर राज्यातील कामगारांमुळेच चोरीचे प्रमाण वाढले आहे, असा दावा अनिल पाटील यांनी केला आहे. मात्र, या दाव्याला अद्याप पोलीस किंवा इतर अधिकृत यंत्रणेकडून दुजोरा मिळालेला नाही. पोलीस तपासानंतरच चोरीमागील नेमके कारण आणि आरोपी स्पष्ट होणार आहेत.


0 Comments