Advertisement

Breaking News
Loading...

गंगेवाडीतील खडी क्रशरचा ‘महाघोटाळा’ अंजली दमानियांच्या दारी! टॅक्स-रॉयल्टी बुडवल्याचा गंभीर आरोप; बिनपरवाना उत्खननाचीही माहिती आरटीआय कार्यकर्त्याने दिली...

 


दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज |डॉ. राजदत्त रासोलगीकर |

दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील खडी क्रशर चालक-मालकांकडून टॅक्स व रॉयल्टी भरली जात नसल्याचा तसेच काही ठिकाणी परवाना नसतानाही उत्खनन होत असल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन झुंबर जाधव यांनी केला आहे. यासंदर्भातील आरटीआयमधून प्राप्त कागदपत्रांसह त्यांनी सोमवारी मुंबई येथे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन माहिती दिली.

गंगेवाडी परिसरातील खडी क्रशरबाबत मिळालेल्या कागदोपत्री माहितीनुसार शासनाचा महसूल तसेच ग्रामपंचायतीचा कर बुडत असल्याचा दावा जाधव यांनी दमानिया यांच्यासमोर केला. काही खडी क्रशरधारकांकडे आवश्यक परवाने नसतानाही खनिज उत्खनन सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या प्रकरणाबाबत संबंधित तहसीलदार, खनिकर्म विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप जाधव यांनी केला.

जाधव यांनी सादर केलेली माहिती व कागदपत्रे दमानिया यांनी समजून घेतली असून, याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, गंगेवाडीतील खडी क्रशर प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांची आता संबंधित विभागाकडून चौकशी होणार का आणि शासनाचा महसूल बुडत असल्याचे आढळल्यास दोषींवर कोणती कारवाई केली जाणार, याकडे दक्षिण सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments