Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपच्या पाच तायक्वांडोपटूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड... जिल्हास्तरीय स्पर्धेत पाचही खेळाडूंची सुवर्ण कामगिरी; पुण्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र...

 


भंडारकवठे | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | माळशिरस-पिलीव येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमी, मंद्रूपच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पाच सुवर्णपदकांची कमाई केली. विविध वजनी गटांत प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पाचही खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळविला असून, त्यांची पुणे येथे होणाऱ्या विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १४, १७ व १९ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मंद्रूपच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले.


१४ वर्षांखालील मुलींच्या गटात नंदिनी मुगळे हिने २० ते २२ किलो वजनी गटात, तर दीक्षा हेळकर हिने २२ ते २४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला.

१७ वर्षांखालील मुलींच्या गटात श्रावणी नंदुरे हिने ४६ ते ४९ किलो, पौर्णिमा खंदारे हिने ५२ ते ५५ किलो, तर समृद्धी लोभे हिने ६३ ते ६८ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

या पाचही खेळाडूंची ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान पुणे येथे होणाऱ्या विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरावर केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे मंद्रूपच्या तायक्वांडो क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राहिली आहे.

ग्रामीण भागातील खेळाडूंना सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते मोठ्या स्पर्धांमध्येही आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात, हे या यशातून दिसून आले. या कामगिरीमुळे मंद्रूपच्या क्रीडाप्रेमींमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या खेळाडूंना दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमी, मंद्रूपचे मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशाबद्दल अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण जोडमोटे तसेच पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून मंद्रूपचे नाव उज्ज्वल करण्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.



Post a Comment

0 Comments