दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी परिसरात २४ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज, २० सप्टेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे आहेरवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव सचिन अभिमन्यू सासवे (वय २४, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, सचिन हा स्वतःच्या शेतात असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सचिनचा मृत्यू झाला.
चारित्र्याच्या संशयातून पूर्वीचा वाद?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून यापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी वळसंग पोलिसांनी धोंडीबा लक्ष्मण सासवे आणि आयुष लक्ष्मण सासवे या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे घटनेबाबत चौकशी सुरू आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला
घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा व प्राथमिक तपासाची कार्यवाही करण्यात आली असून मृतदेह श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालय, सोलापूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे आहेरवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
वळसंग पोलीस ठाण्याचे PSI रतिकांत कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. खुनाचे नेमके कारण, वापरण्यात आलेले शस्त्र आणि घटनेमागील इतर बाबी तपासातून समोर येणार आहेत.






0 Comments