'रविंद्र आमसिद्ध माशाळे, उपसरपंच (पाणी चोरीच्या आरोपावरून गुन्हा दाखल)'
कुसूर - खानापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |ग्रामस्थांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाइपलाइनला बेकायदेशीररीत्या जोडणी करून पाणी थेट स्वतःच्या शेतातील विहिरीत वळविल्याच्या आरोपावरून कुसूर-खानापूरचे उपसरपंच रविंद्र आमसिद्ध माशाळे यांच्याविरोधात मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सार्वजनिक पाण्याच्या गैरवापराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
याबाबत ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल कांताप्पा कुंभार (वय ३८, रा. आचेगाव) यांनी मंद्रूप पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात असताना ग्रामपंचायत सदस्य रमेश हेरकर, नानासाहेब बिराजदार, महानंदा हत्ताळे व उज्वला व्हनमाने यांनी उपसरपंच माशाळे हे ग्रामपंचायतीच्या मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइनमधून बेकायदेशीररीत्या पाणी घेऊन शेतीसाठी वापरत असल्याची तक्रार केली.
त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद शाळा खानापूरच्या बाजूला असलेली मुख्य पाइपलाइन फोडून त्याला दुसरा पाइप जोडण्यात आल्याचे आणि त्याद्वारे पाणी शेतातील विहिरीत सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत चौकशी केली असता संबंधित पाइपलाइनची जोडणी उपसरपंच रविंद्र माशाळे यांनी केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
विशेष म्हणजे, याबाबत उपसरपंचांना फोन करून विचारणा केली असता, संबंधित पाइप आपणच जोडल्याचे तसेच त्यासाठी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती अप्पर तहसीलदार, मंद्रूप आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला लेखी स्वरूपात देण्यात आली होती. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली. या पाहणीतही बेकायदेशीर पाइप जोडणीद्वारे पाणी वळविल्याचे आढळल्याने पुढील कारवाई करण्याबाबत संबंधित विभागाने लेखी कळविले. अप्पर तहसीलदारांनीही गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिल्यानंतर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ई), ३२४ (३) तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी हे ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांसाठी असताना त्याचा शेतीसाठी बेकायदेशीर वापर झाल्याचा आरोप समोर आल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. आता या प्रकरणात पोलीस तपासातून आणखी काय निष्पन्न होते आणि संबंधित उपसरपंचावर प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
अधिक तपास पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे हे करीत आहेत.


0 Comments