Advertisement

Breaking News
Loading...

लोकमंगलच्या तीनही साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार रुपये ऊस बिल अदा..! ३१ ऑक्टोबरपर्यंतची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; पुढेही दर दहा दिवसांनी बिल देण्याची ग्वाही...

 


भंडारकवठे | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे | लोकमंगल उद्योग समूहाच्या तीनही साखर कारखान्यांनी गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दानुसार ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंतची संपूर्ण ऊस बिले प्रतिमेट्रिक टन ३ हजार रुपये दराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. अशी माहिती लोकमंगल उद्योग समूहातर्फे देण्यात आली.

यामध्ये लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज लि., बीबी दारफळ, लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को-जनरेशन इंडस्ट्रीज लि., भंडारकवठे आणि लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि., लोहारा (धाराशिव) या तीन कारखान्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, यापुढील काळातही गाळपासाठी येणाऱ्या उसाचे बिल दर दहा दिवसांनी अदा करण्यात येईल, अशी ग्वाही समूहाकडून देण्यात आली आहे. वेळेत ऊस बिल अदा करण्याच्या भूमिकेतून लोकमंगल शुगर्सने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकमंगलच्या तिन्ही कारखान्यांना ऊस पुरवठा करून सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे उद्योग समूहातर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. आगामी काळातही शेतकऱ्यांनी लोकमंगलच्या कारखान्यांना ऊस पुरवठा करून सहकार्य करावे आणि सर्वांच्या सहभागातून यंदाच्या गळीत हंगामात विक्रमी ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन लोकमंगल उद्योग समूहातर्फे करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments