दक्षिण सोलापूर प्रतिनिधी – 24 नोव्हेंबर 2025: आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचे गस्त आणि गुप्त तपास अधिक कडक करण्यात आले आहेत. त्याच मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने आज मोठी कारवाई करत अवैध पिस्तूलासह एक इसम रंगेहात पकडला आहे.
गोपनीय माहितीवरून नांदणी टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या हॉटेल शरण बसवेश्वर परिसरात संशयित हालचाल असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांना मिळाली. आदेशानंतर पथकाने त्वरित परिसराला घेराव घालून तपास केला.
कपड्यांच्या वर्णनावरून मिळालेल्या माहितीनुसार पांढरी पॅन्ट आणि गडद जांभळा शर्ट घालून उभा असलेला इसम ताब्यात घेतला असता त्याची ओळख हुसेनबाशा रजाक सय्यद (वय 46, रा. शेळगी, सोलापूर) अशी पटली.
तपासणीदरम्यान त्याच्या पॅन्टमध्ये देशी बनावटीचे 1 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे सापडली. पुढील चौकशीत हे शस्त्र त्याने कर्नाटकातील कंचनाळ येथील चांद या व्यक्तीकडून घेतल्याची कबुली दिली.
या कारवाईत एकूण 35,400/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 399/2025, भारतीय शस्त्र अधिनियम 1959 कलम 3, 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात सहा. पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील, पोउपनि डांगे, पोहेकॉ सलीम बागवान, विजयकुमार भरले, पोकॉ प्रमोद शींपाळे, चापोकॉ दिलीप थोरात यांचा समावेश होता.

0 Comments