मोहोळ/ हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: मोहोळ तालुक्यातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. कॉलेजला जात असलेल्या दोन विद्यार्थिनींना भरधाव टेम्पोने धडक दिल्याने दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मोहोळसह तांबोळे आणि नजीक पिंपरी परिसरात शोककळा पसरली आहे.
तांबोळे येथील प्रज्ञा कोकाटे आणि नजीक पिंपरी येथील स्नेहल वाघमोडे या दोघी आज सकाळी सुमारे ७ ते ७:३० च्या दरम्यान दुचाकीवरून कॉलेजला निघाल्या होत्या. दोघीही ११ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होत्या. नजीक पिंपरीच्या हद्दीत समोरून येणाऱ्या एम.एच. १३ ई.पी. ००१९ क्रमांकाच्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की प्रज्ञा कोकाटेचा जागीच मृत्यू झाला, तर स्नेहल वाघमोडे गंभीर जखमी झाली. तिला तातडीने सोलापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच तिचाही मृत्यू झाला. एका क्षणात दोन हसती-खेळती कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, टेम्पो चालकाच्या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेने पुन्हा एकदा ओव्हरस्पीडिंग आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित झाले आहे.



0 Comments