तुळजापूर / धाराशिव हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने तुळजापूर येथे दाखल होत असतात. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी लक्षणीयरीत्या वाढली असून, विविध राज्यांतून सहकुटुंब देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे मंदिर प्रशासनावरही ताण वाढला आहे.
अशाच गर्दीचा फायदा घेत स्वतःला आयएएस अधिकारी असल्याचे भासवून व्हीआयपी दर्शन मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बोगस अधिकाऱ्याचा तुळजाभवानी मंदिरात पर्दाफाश झाला आहे. लोकसेवा आयोगाचे बनावट ओळखपत्र दाखवून निखिल मदनलाल परमेश्वरी याने कुटुंबीयांसह व्हीआयपी दर्शनासाठी अट्टाहास केला.
मात्र मंदिर संस्थानच्या सतर्क कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्याची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने सादर केलेले आयडेंटीटी कार्ड बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित तोतयास तात्काळ तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, तुळजापूर पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून संबंधित व्यक्ती मूळ उत्तर प्रदेशातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बनावट ओळखपत्राच्या आधारे व्हीआयपी सुविधा मिळवण्याचा हा प्रकार उघडकीस आल्याने मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे भाविकांच्या सुरक्षिततेसह व्हीआयपी दर्शन व्यवस्थेबाबत अधिक कडक तपासणीची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.



0 Comments