Advertisement

Breaking News
Loading...

श्रम केल्यास आरोग्य सुदृढ राहते.... संतोष पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्र. कुलसचिव प्रा.लकडे यांचे प्रतिपादन...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. प्रत्येकाने स्वतःसाठी, समाजासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी श्रम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. अतुल लकडे यांनी केले.


ते बसवनगर (ता. दक्षिण सोलापूर) येथे मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने आयोजित २३ व्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

आई-वडिलांचे प्रेम सर्वश्रेष्ठ असून त्यांनी दिलेल्या संस्कारांचे जतन केले पाहिजे. वडिलधारी माणसे, गुरुजनांचा आदर करावा तसेच खेळाला महत्त्व द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सी. जी. हविनाळे होते. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी एकाग्र राहावे. योग, प्राणायाम केल्यास आरोग्य उत्तम राहते. निरोगी राहण्यासाठी सकस व सुरक्षित अन्न आवश्यक असून शेतीतून निरोगी अन्ननिर्मिती करणे महत्त्वाचे आहे. तसेच वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतील.

संस्थेचे सचिव एम. डी. कमळे यांनी सांगितले की, श्रमसंस्कार जपण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरातून विद्यार्थ्यांना वैचारिक मेजवानी व व्यक्तिमत्त्व विकासाची संधी मिळेल.

यावेळी संस्थेचे विश्वस्त नागेश बिराजदार, सरपंच निखिल राठोड, प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप, सुराज्य भवनचे बलभीम वारे, ग्रामसेवक राजेभाई चितारी आदी मान्यवर उपस्थित होते. बलभीम वारे यांनीही आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एच. एल. जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. शिवानंद तोरवी यांनी करून दिला. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एस. ए. निंबर्गी यांनी केले.

यावेळी रासेयो सदस्य प्रा. डॉ. जवाहर मोरे, प्रा. डॉ. एम. सी. हजारे, प्रा. डॉ. बी. एस. कोरे, प्रा. व्ही. एस. आटकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments