मंद्रूप | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आयोजित क्रीडा सप्ताहात SP पोलीस अधीक्षक चषक क्रिकेट स्पर्धेत सोलापूर डिव्हिजन पोलिस संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. तर खो-खो स्पर्धेत मंद्रुपच्या न्यू गोल्डन क्लबने अव्वल कामगिरी करत विजय संपादन केला.
क्रिकेटच्या अंतिम सामन्यात सोलापूर डिव्हिजन संघाने सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय संघावर मात करत चषकावर आपले नाव कोरले. या विजयात उपविभागीय अधिकारी संकेत देवळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, गोपनीय शाखेचे सागर चव्हाण, कॉन्स्टेबल अशपाक मियावाले व कॉन्स्टेबल श्रीकांत जमादार यांनी अष्टपैलू खेळी साकारली.
या सामन्यात कॉन्स्टेबल श्रीकांत जमादार यांना ‘मालिकावीर’, तर कॉन्स्टेबल सागर चव्हाण यांना ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कॉन्स्टेबल अशपाक मियावाले यांच्या भेदक गोलंदाजीने संघाला निर्णायक विजय मिळवून दिला.
खो-खो स्पर्धेतील विजयी संघासह क्रिकेट स्पर्धेतील उत्कृष्ट खेळी करणाऱ्या खेळाडूंचा मंद्रुपचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार प्रा. डॉ. राजदत्त रासोलगीकर, बबलू शेख, मल्लिकार्जुन कांबळे, आप्पाराव वाघमारे, आरिफ नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.

.jpeg)
0 Comments