विजयपूर | हॅलो रिपोर्टर न्यूज: जिल्हा प्रतिनिधी यलप्पा रगटे:
कर्नाटक राज्यातील विजयपूर शहरात शुक्रवार, दि. 9 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते शहरातील बस स्थानकाचे नामकरण ‘कित्तूर राणी चन्नम्मा बस स्थानक’ असे करण्यात आले. याच कार्यक्रमात विजयपूर शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ देखील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमास कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विजयपूर जिल्ह्याचे पालकमंत्री एम. बी. पाटील, बागलकोटचे आमदार शिवानंद पाटील, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, “कित्तूर राणी चन्नम्मा या स्वातंत्र्यपूर्व काळातील शौर्य, त्याग आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाने बस स्थानकाचे नामकरण करणे ही विजयपूरसाठी गौरवाची बाब आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे या भागातील सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.”
पुढे बोलताना त्यांनी राज्य सरकार सामाजिक न्याय, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांना सर्वोच्च प्राधान्य देत असून ग्रामीण आणि सीमावर्ती भागांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले आणि नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात या उपक्रमाचे स्वागत केले.


0 Comments