Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूरच्या सुपुत्राचा देशाला अभिमान... आयपीएस सलमानताज पाटील यांची उत्तर प्रदेश पोलिसमध्ये DIG पदावर पदोन्नती...

 


औज मंद्रूप | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :

सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि उत्तर प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी सलमानताज जाफरताज पाटील (IPS – 2012 बॅच) यांची उत्तर प्रदेश पोलिस दलामध्ये उपमहानिरीक्षक (DIG) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.


यापूर्वी सलमानताज पाटील हे केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्था (CDTI), हैदराबाद येथे संचालक (Director) म्हणून कार्यरत होते. त्यांनी २ जून २०२५ रोजी संचालकपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील विविध राज्यांतील पोलीस अधिकाऱ्यांसाठी सायबर सुरक्षा, नवीन फौजदारी कायदे तसेच दहशतवाद विरोधी प्रशिक्षण यांसारख्या अत्याधुनिक विषयांवर प्रभावी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले.


आता त्यांच्या कार्याची दखल घेत थेट उत्तर प्रदेश पोलिस दलात उपमहानिरीक्षक (DIG) या जबाबदारीच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरसारख्या शहरातून राष्ट्रीय पातळीवर इतक्या मोठ्या पदावर नियुक्ती झाल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.


सलमानताज पाटील यांनी दुसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत यश मिळवले असून ते सोलापूर शहरातील पहिले मुस्लिम आयपीएस अधिकारी ठरले आहेत. सोलापूर येथील सेंट जोसेफ हायस्कूल येथे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवून प्रशासकीय सेवेत प्रवेश केला.


त्यांचे वडील जाफरताज पाटील हे मूळचे औज मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील रहिवासी आहेत. कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


Post a Comment

0 Comments