भंडारकवठे | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लू अण्णा कांबळे : भंडारकवठे येथील जीवन विकास प्रशालेमध्ये पीएचडी पदवी प्राप्त श्री संदीप महादेव कमळे यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले अहिल्यादेवी होळकर युनिव्हर्सिटी , सोलापूरचे अधिष्ठाता प्राचार्य माननीय डॉ. इकबाल तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत.
डॉ. तांबोळी पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून संगणकाचा शैक्षणिक उपयोग करावा तसेच जास्तीत जास्त वाचनाची सवय लावावी. शिक्षणाच्या बळावर शाळा, गाव आणि आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पीएचडी पदवी प्राप्त श्री संदीप महादेव कमळे यांचा सत्कार माननीय प्राचार्य श्री इकबाल तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथींचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य श्री मलकारी ए. एस. यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना संदीप कमळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “या शाळेमुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज येथे पोहोचलो आहे. कितीही मोठा झालो तरी माझ्या शाळेला आणि गुरूंना कधीही विसरणार नाही.” विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांचा मार्ग स्वीकारल्यास निश्चितच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी दि. शि. कमळे गुरुजी व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. संगीत पथकाने प्रार्थना गीत सादर केले. ज्येष्ठ शिक्षक श्री विजय बिजर्गी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री मलकारी ए. एस. यांनी केले. सूत्रसंचालन श्री हडपद पी. जी. यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री जेऊरे एस. एम. यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव माननीय श्री कमळे एम. डी., शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय श्री बी. एस. हाडसंगे तसेच संदीप कमळे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.





0 Comments