सोलापूर|हॅलो रिपोर्टर न्यूज|प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना मोठा फटका दिला आहे. विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यासह अक्कलकोट, बार्शी आणि मोहोळ परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील साधेपूर, निम्बर्गी, विंचूर, कुसुर, खानापूर, तेलगाव आदी गावांमध्ये वादळी पावसामुळे शेतातील उभी पिके अक्षरशः आडवी झाली. कलिंगड, गहू, ज्वारी, कांदा आणि द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे मातीमोल झाल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. आधीच हमीभावाच्या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता अस्मानी संकट कोसळल्याने दुहेरी आर्थिक फटका बसत आहे.
स्थानिक प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शासनाकडून तातडीची मदत आणि नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.


0 Comments