Advertisement

Breaking News
Loading...

धक्कादायक! मंद्रूपमध्ये शेततळ्याचा बळी – दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून, शेततळ्यात बुडून दोन निष्पाप शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.



मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची नावे समर्थ मोहन चव्हाण (वय १२) आणि ओंकार रमेश चव्हाण (वय १०) अशी आहेत. दोघेही मंद्रूप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काय घडले नेमके?

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलांचे पालक शेतात कामासाठी गेले असताना समर्थ आणि ओंकार खेळत खेळत शेताजवळील तळ्याकडे गेले. उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांनी तळ्यात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र पाण्याची खोली न समजल्याने दोघेही खोल पाण्यात गेले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला.

सायंकाळपर्यंत मुलं घरी न परतल्याने पालकांनी शोध सुरू केला. ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. तळ्याच्या काठावर कपडे आणि चप्पल सापडल्याने संशय वाढला. अखेर गावकऱ्यांनी पाण्यात उतरून शोध घेतला असता दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले.

आई-वडिलांचा आक्रोश; गावात शोकमय वातावरण:

घटनेनंतर नाईक नगर तांड्यावर एकच हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या लेकरांचे मृतदेह पाहून आई-वडिलांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.

सुरक्षेअभावी संताप; प्रशासनाला प्रश्न:

या घटनेनंतर शेततळ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी तळ्याभोवती संरक्षण भिंत, जाळी किंवा इशारा फलक नसल्याने लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.

👉 ग्रामस्थांची मागणी:

शेततळ्यांना संरक्षक कुंपण लावावे

इशारा फलक बसवावेत

धोकादायक ठिकाणी नियमित देखरेख ठेवावी.

पोलीस तपास सुरू:

घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पटवारी हे करीत आहेत.

पालकांना आवाहन :

उन्हाळ्याच्या दिवसांत मुलं पाण्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे पालकांनी मुलांवर अधिक लक्ष ठेवावे, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!


Post a Comment

0 Comments