सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषदेत “नो व्हेईकल फर्स्ट डे”चा अनोखा प्रयोग राबविण्यात आला. या उपक्रमामुळे झेडपी परिसरात वेगळेच चित्र पाहायला मिळाले.
सकाळी सुरुवातीलाच मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार हे सायकलवरून झेडपीत दाखल झाले. या दृश्याचे फोटो टिपण्यासाठी कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये मोठी गर्दी झाली. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे इलेक्ट्रिक बाईकवर आले, तर सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील या पायी चालत कार्यालयात पोहोचल्या.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य हे इलेक्ट्रिक बाईकवरून एसटी स्टँडपर्यंत जाऊन पुढे एसटीने सोलापूरकडे रवाना झाले. त्यांच्या सोबत युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे यांनीही इलेक्ट्रिक बाईकचा वापर करून सहभाग नोंदवला.
मात्र, या उपक्रमाचा नागरिकांना काहीसा त्रास सहन करावा लागला. झेडपीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर दुचाकींना प्रवेश नाकारल्याने नागरिकांनी गेटबाहेरच वाहनांची पार्किंग केली. त्यामुळे रंगभवन आणि सिद्धेश्वर शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली.
एकूणच, इंधन बचतीचा संदेश देणारा हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला असला, तरी नागरिकांच्या सोयीचा विचार करून नियोजन करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया पुढे येत आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!






0 Comments